आज ३ महिन्यांनी परत आलिये इथे.वाट चुकून!लिहायचं लिहायचं करत राहूनच गेलं.वेळच मिळत नाही हो!(आता वेळ काढायचा असतो हे मीच लोकांना सांगत फिरत असते ती गोष्ट वेगळी!)असो पण आज लिहायला मुद्दाच असा मिळालाय ना की बास!माझी भाचे कंपनी!या वेळच्या सुट्टीचा दौरा माझ्याकडे होता.रोज सकाळी गजर न लावता उठायची सोय झाली होती,रोज संध्याकाळी त्यांची बडबड ऐकणे ,त्यांच्या सोबत खेळणे आणि त्यात त्यांची भांडणे सोडवणे ह उद्योग होता.दिवसभर पिडायला मी सापडलेच नव्हते.पण रविवारी तो योग आला.आणि एकूण ५ जण माझ्या राशीला लागले.सगळे साधारण वय वर्षे ३ ते १० मधले!ही सगळी वरात घेऊन कात्रज सर्पोद्यानात जायचं ठरलं.सोबत मोठी मंडळी पण होतीच.(कारण ही पिल्लावळ घेऊन मी एकटी गेले असते तर ते मलाच हरवून घरी परत आले असते!)
तिथे आम्ही एक एक प्राणी बघत होतो.तिथल्या पाट्या वाचून माहिती घेत होते.(ज्यांना वाचणं शक्य नव्हतं त्यांच्या वाचून दाखवायचं काम अर्थातच माझ होतं)आणि तिथुनच माझ्या परिक्षेला सुरुवात झाली होती!माझं बौद्धिक घ्यायला सुरुवात घरातच झाली होती.सगळ्यांचं आवरुन झालं होतं.माझी गडबड चालु होती खाणं आणि पाण्याच्या बाटल्या,डोक्याचे रुमाल वगैरे साठी!त्यात माझी भाची रुचा आली आणि म्हणाली,"अगं मावशी लवकर आवर नाहीतर ते प्राणी फिरायला जातील!"
मला काय बोलावं तेच कळेना.मी गप्प.हिला काही कळतच नाही या आविर्भावात रुचा पुन्हा म्हणाली,"अगं,आज रविवार आहे ना,मग त्याना शाळेला सुट्टी असणार ना.मग ते फिरायला नाही का जाणार?"
इतक्यात दुसरी भाची सानिका म्हणाली,"प्राण्यांची शाळा कधी असते का?"
मी गार!दोघी माझ्याकडे उत्तरच्या अपेक्षेने बघत होत्या.पण आईने खाऊ साठी बोलावलं आणि मी थोडवेळ सुटले.
तिथे पहिलाच प्राणी बघितला हरीण!आणि यांचे प्रश्न सुरु!
"हरीण झोपते कसे?"
"त्याच्या डोक्यावर शिंग कशी उगवतात?"
मी माझ्या बुद्धीच्या झेपेप्रमाणे(?) जमेल तशी उत्तरे देत होते.
मग बघितली ति निलगाय!तिला निलगाय का म्हणतात याची माहिती सुदैवाने तिथे लिहिलेली होती.पुन्हा मी सुटले.पुढे गेलो कोल्हा,लांडगा बघायला.एकतर मला त्यातला फरक अजुनही कळत नाही.त्यात एकीला ती सगळी नावं इंग्रजी मधे सांगावी लागत होती.(पुन्हा पंचाईत)
आणि तिथे गेल्यावर छोट्या भावाने "ताई,इथे कुत्री कशाला ठेवलियेत ग?"असा प्रश्न टाकला!
पुढे हत्ती बघायला गेलो.भारतीय हत्ती आणि आफ्रिकन हत्ती अश्या दोन पाट्या तिथे होत्या.आणि तिथे दोनच हत्ती होते.दोघेही भारतीय वाटत होते!(हा निष्कर्ष माझा नाही!)
"दोन्ही पण हत्ती इंडियन आहेत ना?आफ़्रिकन बरोबर त्यांचं पटत नसेल म्हणुन त्याना नाही ठेवलय ना इथे?" इति रुचा.
"हो असेल तसं!" मी
पुढे साप बघायला गेलो!सापाला दोघीजणी घाबरत असल्याने जास्त प्रश्न आले नाहीत.पण सुसर-मगर बघत असताना सानिकाचा प्रश्न,"मावशी मगरीला दात किती असतात ग?"
माझी दांडी गुल!तोंड उघडे ठेवुन झोपलेल्या मगरीचे तिने मला दात मोजायला लावले!
कुठल्याच परिक्षेत कधिही नापास न झालेली मी यात मात्र भोपळ्यापेक्षाही कमी मार्काने नापास झाले!
हे प्रश्न कसे सोडवायचे या विचारातच घरी आलो.आणि रुचाला नेमका सकाळचा प्रश्न आठवला."मावशी प्राण्यांची शाळा का नसते ग?त्यांना बोलता का येत नाही?गाण्यातले प्राणी-पक्षी कसे बोलतात?प्राण्यांचा डॉक्टर असतो तर टिचर का नाही?"
मला तरी अजुन या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहियेत.तुमच्या कोणाकडे असतील तर मला नक्की सांगा हं!!!!!
उत्तरं नाहीत, पण प्रश्न खुप आवडले ;-)
ReplyDelete