माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Monday 22 November 2010

जन्मसिद्ध हक्क

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !!टिळकांचे हे वाक्य म्हणजे अफतातून होते.
या वाक्यात थोडा फार बदल करून आम्ही वापरतो एवढच !!कारण टिळक पण पुण्याचेच आणि मी सुद्धा पुण्याचीच!!
 आता माझे जन्मसिद्ध हक्क म्हणजे फटकळ पणे बोलणे,पायात पाय घालून समोरच्याला पाडणे,गडगडाटी हास्य करणे वगैरे!!आता त्यात जन्मजात असलेली गोष्ट म्हणजे धडपडणे !
आता  माझ्या लहान पणीची गोष्ट !!साधारण २ १/२ वर्षाची असतानाची ! (अर्थात हे माझ्या आई ने सांगितले अनुभव.उगाच तुला एवढ्या लहान पणाच मला कस आठवतंय हे विचारू नका!)
रोज संध्याकाळी आई सोबत फिरायला जायचं हा छंद !!आणि नुकतेच आई ने वाचायला शिकवले होते.तोंड वर करून रस्त्यावरच्या पाट्या वाचणे,बस,ट्रक रिक्षा वर लिहिलेले वाचणे हा नेहेमीचा उद्योग.एका शिंप्याच्या दुकानासमोर कायम धडपडायचे !!
कारण- वर बघून वाचत चालणे !!(हम ने ऐसा किया हि  क्या ही जो हम नीचे देखे !!-साभार-गनुबा- पापड पोल)
बरेच दिवस त्या शिंप्याने बघितले .एक दिवस आई ला म्हणाला ,"ताई म्हसोबाला कोंबड सोडा !पोरगी रोज एकाच जागी पडतीया !!" 
आता आईला हसावं का रडावं कळेना !!आता या पोरीमुळे काय काय दिव्य करावी लागनारेत हा विचार तिच्या मनात चमकून गेला असावा !!
आणि अजूनही हा हक्क मी बजावतिये!!
निर्विवाद पणे !!

Wednesday 10 November 2010

दिवाळी संपली रे.........

दिवाळी शी माझे काही वाकडे नाही.पण त्या सोबत आलेल्या प्रश्नांनी मी हैराण झाले होते.आणि नेहेमीप्रमाणे माझे प्रश्न शत्रू (?) होते नेहेमीप्रमाणे माझी भाचे कंपनी! आणि नेहेमीप्रमाणे असे प्रश होते कि ज्याची उत्तरे माझ्याकडे नव्हती.
त्यातल्या एकाशी पहिल्यादिवशी झालेला हा (सु)संवाद (?)
"आत्या,दिवाळी साठीच गाणं कोणत ग?"
"दिन दिन दिवाळी,गाई म्हशी ओवाळी..."पुढे मी काही म्हणायच्या आताच त्याने हाताने "बास"असा इशारा केला ...चला सुटलो ,कारण पुढच गाणं मला येत नाही हे त्याला कळणार नाही असा मी मनात म्हणे पर्यंत त्याचा प्रश्न "गाई म्हशी ओवाळतात ना ?मग तेल लाऊन अंघोळ झाल्यावर आई आपल्याला का ओवाळते ?गाई म्हशींना का नाही?"
माझी विकेट पडलेली !!!
वेळ मारून  न्यायला मी म्हटलं " अरे ,गाई-म्हशींना पण ओवाळतात "वसू बारसेला" आणि आपल्याला अभ्यंग स्नानाच्या दिवशी!!"
लगेच त्याचा पुढचा प्रश्न "मग गाई म्हशींना तेल लाऊन अंघोळ का नाही घालत?"
"ते तू आईला विचार "-इति मी 
हा (सु)संवाद (?) इथे संपला 
खरे फटके लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फुटले 
"मावशी,लक्ष्मीपूजन म्हणजे पैश्याची पूजा ना ?"
बरोबर -मी 
म्हणजे घरात असलेली लक्ष्मी वाढावी म्हणून हि पूजा करतात ना ?
हो .मी -किती शहाणी आहे ,लहान असून पण तिच्या आईने सांगितलेलं कस लक्षात ठेवलंय असं मी म्हणेपर्यंत(अर्थात मनातल्या मनात) तिचा निरुत्तर करणारा प्रश्न माझ्यावर सुतळी बॉम्ब पेक्षा  मोठ्या आवाजात फुटला 
मग त्या दिवशी एवढे  फटके का फोडतात ?-इति रुचा 
आनंद साजरा करण्यासाठी !  
मग हे असे इतके फटाके फोडून लोक पैसे वायाच घालवतात ना?त्यात प्रदूषण किती होते .असे पैसे वाया घालवून आणि घरात लक्ष्मीची पूजा करून पैसे कसे वाढणार ???
त्यापेक्षा नको ती दिवाळी आणि नको ते फटाके ......
.
.
 
 




 या प्रश्नांचे उत्तर आहे का कोणाकडे???